Join us

विद्यार्थ्यांसाठी असणारी अपघात विमा योजना होणार अधिक सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य व जीवनाच्या ...

उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य व जीवनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी अपघात विमा योजना महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. ही योजना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदविका विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. ती अधिक सक्षम बनविण्यासाठी आणि काटेकोर अंमलबजावणीसाठी, तसेच त्यात कालानुरूप बदल करून विद्यार्थी व पालकांना त्याचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गठित केली आहे.

कोविड काळात अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे शिक्षण प्रवाहातून बाहेर पडावे लागले. त्यामुळे, अपघात विमा योजनेसोबत साथरोगासंदर्भातही विद्यार्थ्यांसाठी या योजनेत सुविधा उपलब्ध करता येईल का, याची चाचपणी या समितीमार्फत करण्यात येईल. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थी अपघात विमा योजनेचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने असणार असून, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, खालसा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. किरण माणगावकर, डी. एन. बी. ऑर्थोपेडिकचे डॉ. फैज अन्सारी, प्रोफेसर इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. आर. के. दुग्गल हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये गट विमा म्हणून सध्या किती शुल्क आकारण्यात येते, त्यात किती आणि कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याचा अभ्यास करणे, या योजनेसाठी इन्शुरन्स कंपनी कोणत्या सुविधा देणार आणि त्यातील कोणती सुविधा विद्यापीठासाठी योग्य असेल याचा अभ्यास करणे अशा बाबी या समितीच्या कार्यकक्षेत असतील.

........................