गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - गोराई खाडीवर बुधवारी रात्री भरधाव वेगाने येणारी कार पार्क करण्यात आलेल्या स्टारलाईन बसला मागच्या बाजूने धडकली. प्रत्यक्षदर्शीनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की त्यात कारच्या बोनेटचा चक्काचूर झाला. तसेच मिनी बस पुढे ढकलली जाऊन त्याच्या बाजूला असलेल्या मोटरसायकलस्वाराला त्याचा धक्का लागून तो जागीच बेशुद्ध झाला आणि अजून एका कारचे देखील त्यात नुकसान झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन ते चार जणांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती असून अधिक तपास सुरू आहे.
गोराई खाडी मार्गावरून शांतीधाम आश्रमच्या गेट समोर हा अपघात रात्री साडे अकरा ते बारच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, गोराई खाडीवरुन एक सफेद रंगाची कार गोराई डेपोच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. त्या कारमध्ये चालकासह एकूण पाच जण बसले होते. चालकाचा कारवरील ताबा सुटून ती स्टारलाईन कंपनीच्या मिनी बसला जाऊन धडकली. त्यामुळे बस पार्किंगमधून काही प्रमाणात बाहेर ढकलली गेली. ज्यात पुढे असलेला मोटरसायकल स्वार जखमी झाला तर अजून एका कारलाही त्याचा फटका बसला. कारचा चालक हा एअरबॅगमुळे वाचला मात्र त्याच्यासोबत असणारे कारमध्ये अडकले. या सर्वांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांना मेसेज आणि फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करत आहेत.