खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ढेकू गाव हद्दीत रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे ५:३० च्या सुमारास घडली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कऱ्हाडहून नवी मुंबई येथे जाणारा ट्रक ढेकू गावच्या हद्दीत आला असता चालक बाळू नामदेव मेटे याने ट्रक रस्त्यालगत उभा केला. क्लीनर राहुल बाळू मेटे (२६, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हा टायरमधील हवा तपासण्याकरिता उतरला. त्यावेळी मागून आलेल्या ट्रेलरने ट्रकला धडक दिली.
या भीषण धडकेत ट्रेलरखाली आल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद गौड याचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला.
कॉइल पडले रस्त्यावरट्रकला ट्रेलरने मागून जोरदार धडक दिली. ट्रेलरचालकाने जोरात ब्रेक दाबल्याने ट्रेलरवरील दोन कॉइल बांधलेले चेन लॉक तुटले व लोखंडी कॉइल ट्रेलरची केबिन तोडून रस्त्यावर पहिल्या लेन व तिसऱ्या लेनवर खाली पडले.
वाहतूक विस्कळीतकॉइल रस्त्यावर पडल्याने व अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. महामार्ग पोलिस केंद्र बोरघाटचे पोलिस उपनिरीक्षक संजय हेमाडे व त्यांचे कर्मचारी, खोपोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आयआरबी कंपनी व देवदूतचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रेलर रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.