रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील विन्हेरे येथे कोकण रेल्वेमार्गावरील रूळ सोमवारी तुटलेल्या स्थितीत सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आढळला. ट्रॅकमनच्या वेळीच ही बाब लक्षात आली. प्रसंगावधान दाखवत त्याने सिग्नल यंत्रणेला याबाबत तातडीने सूचना दिली. त्यानंतर तत्काळ मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. काही मिनिटांत या मार्गावरून मुंबईहून गोव्याकडे ‘जनशताब्दी’ जाणार होती. मात्र, ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. तासाभरात रुळाची दुरुस्ती करून पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रविवारी कोकण रेल्वेमार्गावरून मडगाव-मुंबई डबलडेकर रेल्वे सुरू करण्यात आली आहे. त्याचे रविवारी रात्री रत्नागिरीत स्वागत करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोकण रेल्वेच्या महाड तालुक्यातील विन्हेरे येथील मार्गावर रेल्वेचा ट्रॅक एका बाजूने तुटलेल्या स्थितीत आढळला. हवामानात होणाऱ्या बदलामुळे ट्रॅकमध्ये बदल होतात आणि थंड हवामानामुळे हा ट्रॅक तुटला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ट्रॅक तुटलेल्या स्थितीत आढळल्यानंतर ट्रॅकमनने तत्काळ सूचना दिली. त्यामुळे जनशताब्दी थांबविण्यात आली. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी कोचुवेली एक्स्प्रेस खेडमध्ये थांबवून ठेवण्यात आली. अखेर तुटलेल्या ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर या दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वेमार्गावर अपघात टळला
By admin | Published: December 08, 2015 12:09 AM