- गौरी टेंबकर - कलगूटकर /मनोहर कुंभेजकर मुंबई : कोरोनाकाळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे सतीश धुमाळ या तरुणाने भाऊ स्वप्नील आणि अन्य मुलांच्या मदतीने बाजीप्रभू ढोलताशा पथक उभे केले. प्रयत्न, जिद्द आणि तालीम करत हे पथक नावारूपाला आले. हिमाचल, उत्तर प्रदेशमध्येही कामाचा डंका या ढोल पथकाने वाजवला. मात्र, अचानक एका चुकीच्या वळणाने हा आवाज कायमचा शांत झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सहवास सुटला; पण आम्हाला तुमची आठवण सदैव येत राहील अशा शब्दांत स्थानिकांनी निरोप दिला आणि गोरेगावसह अख्ख्या मुंबई शहराचे डोळे पाणावले.
रविवारी कृतिक लोहित ऊर्फ साई (१७) या मुलाचा मृतदेह घरी आणताच त्याच्या माउलीने हंबरडा फोडला. दिंडोशी परिसरात बीएमसी कॉलनीत राहणाऱ्या कृतिकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील संजय यांचे २०१७ मध्ये निधन झाल्यावर मोठी बहीण नंदिनी आणि आई संजना यांच्यासोबत तो राहत होता. घरकाम करत आईने कर्ज काढून स्वतःचे घर घेतले, मात्र, आज मुलगाच सोडून गेला. त्याची बहीण निर्मल कॉलेजमध्ये १४ वी शिकत होती, तर तो बारावीत गेला होता. आमच्या खानदानात मुलगा नाही. शिर्डीला साईबाबांना नवस केल्यावर त्याचा जन्म झाला. त्यामुळे तो लाडका होता आणि प्रेमाने त्याला साई बोलायचो, असे नागपूरहून आलेली त्याची काकी शोभा लोहीत यांनी सांगितले.
‘त्या’ सहा जणांना अखेरचा निरोपवीर बाजीप्रभू ढोलताशाचे प्रमुख सतीश धुमाळ, स्वप्नील धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, यश यादव, राहुल गोठण यांच्यावर शनिवारी रात्री गोरेगाव पूर्व आरे चेक नाका येथील शिवधाम स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.