Accident: शिंग्रोबाच्या खिंडीचा ‘शॉर्टकट’ ठरतोय मृत्यूला आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:37 PM2023-04-16T14:37:17+5:302023-04-16T14:37:34+5:30
मुंबई-पुणे जुन्या महामागार्वरील खोपोलीजवळील बोरघाटातील शिंग्रोबाची खिंड अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. हायवेचे अंतर कापण्यासाठी थोडासा ‘शॉर्टकट’ मिळत असल्याने चालक त्यांचा सर्रास वापर करतात.
खोपोली : मुंबई-पुणे जुन्या महामागार्वरील खोपोलीजवळील बोरघाटातील शिंग्रोबाची खिंड अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. हायवेचे अंतर कापण्यासाठी थोडासा ‘शॉर्टकट’ मिळत असल्याने चालक त्यांचा सर्रास वापर करतात. मात्र त्याठिकाणी खिंड व दरीजवळ सुरक्षित उंच कठडे, बॅरिकेड्सचा अभाव असल्याने ते अपघाताचे निमंत्रण ठरत आहे. चालकाचे थोडेजरी गाडीवरील नियंत्रण सुटले, दुर्लक्ष झाले तरी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यात याठिकाणी एकूण ३ अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
पुवर्पच्या दोन्ही वेळी बस झाडावर आदळल्याने दरीत कोसळण्यापासून वाचली होती. मात्र यावेळी बस चालकाला नशिबाची साथ मिळाली नाही. आणि त्याच्यासह १३ प्रवाशांना यमसदनी जावे लागले.
शिंग्रोबाच्या वरील खिंडीतून अवजड वाहने, बस यांना जाण्यास बंदी आहे, तरीही वाहन चालक शॉर्टकट म्हणून या मार्गाचा वापर करतात. दरीच्या बाजूला संरक्षक कठडे, क्रॅश बॅरियर्स नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर उंच संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. त्याबाबत वाहनचालकांकडून वारंवार मागणी होत असलीतरी राज्य सरकार व महामार्ग प्राधिकरणांचे दुर्लक्ष राहिले आहे. त्याचा फटका आज प्रवाशांना बसला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मदतीसाठी कार्यकर्ते पोहोचू लागले. परंतु अंधार असल्यामुळे दोनशे फूट खाली उतरणे व तिथून जखमींना वर आणणे हे काम खूप जिकिरीचे होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे कार्यकर्ते, यशवंती हायकर्सचे कार्यकर्ते व शिवदुर्गचे कार्यकर्ते यांनी तातडीने मदत कार्य सुरू केल्यामुळे अनेक जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली. दहा ते बारा ॲम्ब्युलन्समधून जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणले जात होते व तेथून प्रथमोपचारानंतर त्यांना कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, येथील वातावरण अतिशय मन हेलावून टाकणारे असे होते. मदतीसाठी प्रवाशांचा आक्रोश सुरू होता.