नवी मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांना गुरुवारी वाशी टोल नाक्याच्या पुढील मानखुर्द जकात नाक्याजवळ अपघात झाला. अपघातामध्ये शिंदे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, जखम फारशी चिंताजनक नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
नवी मुंबईवरून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबईमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते चालले होते. वाशी खाडीपूल ओलांडल्यानंतर पुढे दोन वाहनांचा अपघात झाला. यामुळे शिंदे यांच्या ताफ्यात पुढे असलेल्या दोन वाहनांनीही तत्काळ ब्रेक दाबला. शिंदे बसलेली कार पुढील वाहनावर आदळली. या अपघातामध्ये शिंदे यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जास्त दुखापत झाली नसल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दुखापत अत्यंत किरकोळ असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. अपघातानंतर त्यांची कार क्रेनच्या साहाय्याने दुरुस्तीसाठी नेण्यात आली. कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दुसऱ्या कारने शिंदे पुढील बैठकीसाठी निघून गेले.
फोटो २५ एकनाथ शिंदे - अपघात झाल्यानंतर गाडीची झालेली अवस्था.