Join us

अ‍ॅक्सेल तुटल्यानेच झाला पार्ल्यातील अपघात

By admin | Published: October 28, 2015 1:53 AM

चाकाच्या सेटचा अ‍ॅक्सेल तुटल्यानेच सप्टेंबर महिन्यात विलेपार्ले स्थानकाजवळ लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली होती.

मुंबई : सप्टेंबर महिन्यात विलेपार्ले स्थानकाजवळ लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चाकाच्या सेटचा अ‍ॅक्सेल तुटल्यानेच अपघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल मुख्य सुरक्षा आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघाताची गंभीर दखल सुरक्षा आयुक्तांनी घेतली असून, देखभाल प्रक्रियेत सुधारणा करण्याची शिफारस त्यांनी अहवालातून केली.१५ सप्टेंबर रोजी अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलचे ७ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. यात सहा प्रवासी जखमी झाले होते आणि तब्बल २२ तासांनंतर पश्चिम रेल्वे सुरळीत झाल्याने २५0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या होत्या. घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्र यांच्याकडून चौकशी केली जात होती. चौकशीत रुळावरून घसरलेल्या डब्यांपैकी एका डब्याचे चाक तुटल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भातला अहवाल पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वेच्या लखनौ येथील मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. हा अपघात चाकाच्या सेटचा अ‍ॅक्सेल तुटल्यामुळेच झाल्याचा निष्कर्ष पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी काढला आहे. अहवाल सादर करतानाच त्यांनी काही शिफारशीही केल्या आहेत. यात अ‍ॅक्सेलसंदर्भातल्या समस्येवर मात करण्यासाठी देखभाल प्रक्रियेत सुधारणा करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे लोकलच्या चाकाच्या सेटची देखभाल व्हावी यासह आणखी काही शिफारशीही करत पश्चिम रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. (प्रतिनिधी)चाकाचे अ‍ॅक्सेल तुटल्यामुळेच अपघात झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अपघातानंतर पश्चिम रेल्वेने आपल्या देखभाल-दुरुस्ती पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. हा अहवाल मुख्य सुरक्षा आयुक्तांना सादर केला आहे. - सुशील चंद्र (पश्चिम रेल्वे; रेल्वे सुरक्षा आयुक्त)