नवी मुंबई : भरधाव ओमनी कारची उभ्या कंटेनरला धडक लागून गंभीर अपघाताची घटना बुधवारी पहाटे घणसोली नाका येथे घडली. या अपघातात अरुण पाटील (२६) या तरुणचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला.अरूण वृत्तपत्रे पोचवण्याचे काम करायचा. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अरूण सर्व स्टॉलवर पेपर पोचवत होता. यावेळी सूरज जाधव (२१) हा त्याच्यासोबत होता. वाशीकडून ऐरोलीच्या दिशेने ओमनी (एमएच ४३ एच ३१५८) कारने जात असताना घणसोली नाका येथे अपघात झाला. अरुण हा स्वत: कार चालवत असताना समोर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक झाली. यावेळी कार अतिशय वेगात असल्याने झालेल्या भीषण अपघातात डोके चेपल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या बाजूला बसलेला सूरज हा अपघाताने कारचा दरवाजा उघडल्याने खाली पडून वाचला. त्यालाही दुखापत झाली . मयत अरुण व जखमी सूरज दोघेही कोपरखैरणेत राहणारे आहे. या अपघात प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केली. तर मयत अरुण याच्याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घणसोलीत वृत्तपत्र विक्रेत्याचा अपघाती मृत्यू
By admin | Published: April 16, 2015 2:11 AM