अपघाताने हादरली कुटुंबे

By admin | Published: January 23, 2016 03:23 AM2016-01-23T03:23:19+5:302016-01-23T03:23:19+5:30

कॉफर्ड मार्केट येथे रविवारी हाजी अमीन युसूफ खानच्या (४५) मर्सिडिजच्या धडकेमुळे झालेल्या अपघातामुळे मुनिरा शेखचे (२५) कुटुंब हादरले. जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या

Accidentally scattered families | अपघाताने हादरली कुटुंबे

अपघाताने हादरली कुटुंबे

Next

मुंबई : कॉफर्ड मार्केट येथे रविवारी हाजी अमीन युसूफ खानच्या (४५) मर्सिडिजच्या धडकेमुळे झालेल्या अपघातामुळे मुनिरा शेखचे (२५) कुटुंब हादरले. जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुनिराचे कॉलर बोन तुटले आहे. जबड्याला जबर मार बसला आहे. त्यामुळे तिला बोलता येत नाही. खांद्यालाही जबर दुखापत झाल्यामुळे जास्त काळ ती झोपूनही राहू शकत नाही. त्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेल्या शेख कुटुंबाची घडीच विस्कटली आहे. इतर कुटुंबांचीही अशीच आवस्था आहे. मोलमजुरी करणारीच माणसे जखमी अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुनिराला खाता-पितानाही त्रास होत आहे. मुनिराचा पती आणि चार मुले, त्यापैकी लहान मुलगा काही महिन्यांचा आहे. मुनिरा घरकाम करते, तर तिचा पती ड्रायव्हर आहे. घराचा सगळा भार मुनिरावरच असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पुढचे काही दिवस मुनिराला काम करता येणे अशक्य आहे. त्यामुळे घराचा खर्च कसा चालणार हा प्रश्नच आहे.
जखमी अलिशा शेखने ‘लोकमत’ला सांगितले, ‘फुटपाथच्या मध्यभागी पार्क केलेल्या वाहनांचा आडोसा घेत आम्ही झोपलो. रात्री साडेबाराच्या सुमारास जोराचा हादरा बसला आणि काही क्षणांतच आम्ही रस्त्याकडेला फेकले गेलो. जखमांनी भरलेले शरीर सावरत उभे राहतो तोच डोळ्यासमोर कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. नंतर जे. जे. रुग्णालयात प्राथमिक उपचार करून आम्हाला घरी सोडले. मात्र जर वाहनांचा आडोसा नसता, तर आम्ही वाचलो नसतो.’ (प्रतिनिधी)
एकेकाळी छोटा शकीलचा गँगस्टर असलेल्या खानविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, शस्त्रांची तस्करी असे गुन्हे दाखल आहेत. २००० मध्ये पत्नीची हत्या करून तो दुबईला पसार झाला होता. तेथे त्याची शकीलचा साथीदार तारिक परवीनशी गाठ पडली. मुंबईसह, कोलकाता,
हैदराबाद अशा विविध शहरांमध्ये १९९२, १९९३ आणि २००१ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते.
२००१ मध्ये त्याच्यासह तिघांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. २०१५ मध्ये हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी भायखळा पोलिसांनी अटक केली होती. सध्या रेहमानी ग्रुपच्या अध्यक्षपदी असलेला खान पालिकेतील कामांची कंत्राटे घेतो.
चौघांना डिस्चार्ज
या अपघातात राहुल शेख (४) याच्या उजव्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. अलिशा शेख (४०) हिला फ्रॅक्चर झाले. तिच्यावर बाह्य रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. रशीदा शेख (२५) हिला उजव्या मांडीला मार बसला आहे. चौघांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१५ तासांतील अन्य अपघात
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास एन.एम. जोशी येथील वडाचा नाका परिसरात दुचाकीवरून पेट्रोलिंग करत असताना भरधाव वेगाने आलेल्या हनीस अब्बाज सय्यद (३६) च्या दुचाकीच्या धडकेत दोन पोलीस हवालदार जखमी झाले. प्रकाश दगडू धनगर (३२), भीमराव साळवी (५७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास माटुंगा येथील पाच गार्डन परिसरात भरधाव आलेल्या टॅक्सीच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले. दिनेश चौधरी (१८), सचिन शुक्ला (१९) अशी जखमींची नावे असून ते खालसा कॉलेजचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी टॅक्सीचालक इंद्रपाल सिंग (५८) याला अटक केली आहे.

Web Title: Accidentally scattered families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.