मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाती मृत्यूंच्या संख्येत ७० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीच्या (जानेवारी-मार्च) तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ३५ अपघातांची नोंद झाली आहे. यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ प्रवासी जखमी आहेत. मात्र मुंबई ते नागपूर प्रवास वेगवान करणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांत वाढ झाली आहे. तीन महिन्यांत या महामार्गावर ४५ जणांचे प्राण गेले आहेत.
देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्गावर परिवहन विभागाने इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) कार्यान्वित केली आहे. परिणामी रस्ते अपघातामध्ये घट झाली आहे. २०२४ मधील जानेवारी ते मार्च या तिमाहीत झालेल्या ५६ अपघातांत २७ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर, २२ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. चालू वर्षात याच कालावधीत हाच अतिवेग द्रुतगती मार्गावरील अपघातास प्रमुख कारण ठरत आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासह वाहनचालकांना स्वयंशिस्तीचे धडे देण्यासाठी परिवहन विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबविते. परंतु काही ठिकाणी या उपाययोजनांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. मुख्य रस्त्यांवरही खड्डे असल्यामुळे दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही.
मानवी चुकांमुळे ८० टक्के रस्ते अपघात होतात. यात भरधाव वेगाने वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग यांसारख्या मानवी चुकांचा समावेश आहे. खराब रस्ते हेदेखील अपघातांचे प्रमुख कारण आहे. अनेक शहरांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांवरील भेगा आणि खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत.