Join us

स्कॉच पुरस्काराने ठामपा सन्मानित

By admin | Published: September 25, 2015 2:03 AM

स्मार्ट ई-गव्हर्नन्स अंतर्गत उर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांचा वापर तसेच ठाणे शहरातील देवालये व उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून

ठाणे : स्मार्ट ई-गव्हर्नन्स अंतर्गत उर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांचा वापर तसेच ठाणे शहरातील देवालये व उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती या प्रकल्पांची देशातील पहिल्या ४० प्रकल्पांमध्ये निवड झाल्याने ठाणे महानगरपालिकेस बुधवारी ‘स्कॉच’ आॅडिट आॅफ मेरीट या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नवी दिल्लीत झालेल्या एका शानदार समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी माजी केंद्रीय नगर विकास सचिव एम.रामचंद्रन यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. तसेच निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्पासाठीचा स्कॉच आॅर्डर आॅफ मेरीट हा पुरस्कार आयुक्तांसह प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी इंडस्ट्री सोल्युशन्स मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे संचालक राहुल सावदेकर यांचे हस्ते स्वीकारला.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक व आर्थिक क्षेत्राशी निगडीत समस्या व इतर विषयांवर १९९७ पासून स्कॉच ग्रुप काम करीत असून त्यांनी नुकतेच स्मार्ट ई गव्हर्नन्स २०१५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांची अशी एकूण ४०० नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाने ठाणे शहरामध्ये कार्यान्वित केलेल्या उर्जा कार्यक्षमता व पर्यावरण पूरक एलईडीचा रस्त्यांवरील दिव्यांसाठी वापर हा प्रकल्प तर प्रदूषण नियंत्रण कक्षाने ठाणे शहरातील देवालये व उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेत भारतातील उत्कृष्ट ४० प्रकल्पांमध्ये या दोन प्रकल्पांची निवड झाली आहे. या दोन्हीही प्रकल्पांसाठी ठाणे महापालिकेला स्कॉच आॅर्डर आॅफ मेरीट या पुरस्काराने गौरवले आहे. (प्रतिनिधी)