सिद्धिविनायकाच्या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:45 AM2018-06-28T06:45:30+5:302018-06-28T06:45:43+5:30
सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे. येथील कर्मचारी बाप्पाच्या सेवेत मग्न असतात, पण ते गेल्या कित्येक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करत होते.
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे. येथील कर्मचारी बाप्पाच्या सेवेत मग्न असतात, पण ते गेल्या कित्येक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करत होते. या १३३ अस्थायी कर्मचाºयांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नुकताच या संदर्भातला जीआर राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायक मंदिर वसलेले आहे. या मंदिरात गेल्या १२ ते १४ वर्षांपासून १३३ कर्मचारी कार्यरत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टच्या सेवेत कायम करून घेण्याची मागणी ते गेली अनेक वर्षे करीत होते. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्षपद आदेश बांदेकर यांनी स्वीकारल्यानंतर, त्यांनी कर्मचाºयांच्या मागणीसंदर्भात शासनाशी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या कर्मचाºयांना कायम करण्याविषयी हिरवा कंदील दाखविला.
त्यानंतर, अध्यक्ष आदेश बांदेकर, सिद्धिविनायक न्यासाचे विश्वस्त यांनी १३३ अस्थायी कर्मचाºयांना कायम करण्यासाठी आकृतीबंध आराखडा तयार केला आणि तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. पाठविण्यात आलेल्या या आराखड्याचा शासनाने सविस्तर अभ्यास करून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंजुरीनुसार १३३ कर्मचाºयांना कायम करण्याचा शासकीय जीआर नुकताच काढला आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर इतकी वर्ष मनोभावे काम करणाºया या कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
१२ ते १४ वर्षे काम करणाºया या कर्मचाºयांना आता शासनाच्या जीआरनुसार पगार वाढवून मिळेल, याचा मला जास्त आनंद आहे. सफाई कामगारापासून ते पुजाºयापर्यंत सर्वच अहोरात्र या परिसरात आपले काम चोख करत असतात. सेवेत कायम करून घेण्यात येणार असल्याने, त्यांच्या चेहºयावर हसू फुटले, याचा मला खरंच आनंद आहे. यासाठी आम्ही २५ कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केले आहेत. त्यातून येणाºया व्याजाच्या रकमेतून वेतनवाढीसाठीचा निधी संकलित करणार आहोत. यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
- आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास
१२ ते १४ वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिरात रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांसाठी आम्ही नवीन पदांची आखणी केली आहे. त्यासाठी विश्वस्त आणि आम्ही एकत्र बसून याचा आकृतीबंध तयार केला. यामुळे या १३३ कर्मचाºयांना कायम करण्याविषयी कोणतीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही.
- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास
मंजुरी मिळाली : आस्थापनातील कामकाजात वाढ झाल्याने सेवेसाठी अतिरिक्त कर्मचारी गरजेचे आहेत, असे न्यासाच्या कार्यकारी अधिकाºयांनी विधि आणि न्याय विभागाला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार, आता सर्वसामान्य कामगार ५४, पहारेकरी ४६, सफाई कामगार ७, महिला कामगार ८, सहायक पर्यवेक्षक १, भांडारपाल १, वायरमन ३, पुजारी १३ अशी एकूण १३३ नवीन पदे भरण्यासही मंजुरी मिळाली आहे. या पदांवर अस्थायी कामगारांना कायम करून घेण्यात येईल.