मुंबईत काेराेनाचे रुग्ण वाढल्याची आरोग्य विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:38 AM2021-02-17T06:38:35+5:302021-02-17T06:38:53+5:30

CoronaVirus News : पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागील २-३ दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

According to the health department, the number of patients has increased in Mumbai | मुंबईत काेराेनाचे रुग्ण वाढल्याची आरोग्य विभागाची माहिती 

मुंबईत काेराेनाचे रुग्ण वाढल्याची आरोग्य विभागाची माहिती 

Next


मुंबई : शहर, उपनगरात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलाॅकचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, यापूर्वीच खबरदारी म्हणून पालिकेने मुंबईतील जम्बो कोविड केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागील २-३ दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र पालिका प्रशासनाने रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील रुग्णालये किंवा कोविड केंद्रात रुग्ण दाखल करण्याची सेवा उपलब्ध आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर रुग्णवाढ हाेत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रवासावर निर्बंध लावण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल. शहर, उपनगरात रुग्णवाढीच्या कारणांचे विश्लेषण केले असता, मागील काही दिवसांत परदेशातील पर्यटक मुंबईत येण्याचे प्रमाण वाढते आहे. हवाई आणि रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून वर्दळ वाढत आहे. दिल्ली, गुजरात, केरळ, राजस्थान आणि गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४४५ दिवसांवर
एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी ६४५, सोमवारी ४९३ रुग्ण आढळून आले होते. त्यात काहीशी घट झाली असून मंगळवारी कोरोनाचे ४६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मुंबईत दिवसभरात ४६१ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख १५ हजारावर पोहचला आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४२३ वर पोहचला आहे. ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या २ लाख ९७ हजार १०१ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ५६४९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४४५ दिवस इतका आहे. 

मार्गदर्शक तत्त्वांचे नागरिकांकडून उल्लंघन
लोकलसेवा सुरू झाल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सामान्य नागरिकांकडून मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर राखणे अशा कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: According to the health department, the number of patients has increased in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.