मुंबईच्या साठवणूक क्षमतेनुसार १ कोटी २० लाख नागरिकांना कोरोनाची लस देता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:07+5:302020-12-14T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांजूरमार्ग (पूर्व) येथे कोरोना लसीकरणाच्या साठ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला लसीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांजूरमार्ग (पूर्व) येथे कोरोना लसीकरणाच्या साठ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या साठवणूक क्षमतेनुसार १ कोटी २० लाख नागरिकांना कोरोनाची लस देता येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बाहेरील वातावरणाचा लसींवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी सदर जागेवर २ डिग्री सेल्सियस ते ८ डिग्री सेल्सिअस तपमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरचे दोन उपकरणे बसविण्यात येणार आहे, शिवाय १५ डिग्री सेल्सिअस ते २५ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे उपकरण बसविण्यात येणार आहे.
शीतगृहाचे काम जानेवारी, २०२१ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आहे. लसीच्या साठवणुकीसाठी एक अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी संकुलातील पाच माळांपैकी तीन माळे हे शीतगृह केंद्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठावर चालविण्यात येणार आहे. विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागणार आहे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.
---------------------
शीतगृहाची जय्यत तयारी
कांजूरमार्ग येथे लस साठवणुकीची पूर्व तयारी करण्यात आली आहे. ५ हजार चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार म्हणून निर्देशित आहे. शासन, तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य इत्यादी सर्व बाबींचे निर्देश ठरवून दिले आहेत. लसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मही शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दोन्ही टप्प्यांमध्ये महानगरपालिकेसह सर्व सहभागी यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे.
---------------------
लसीकरण मोहिमेचे पाच टप्पे
लसीकरण मोहिमेचे पाच टप्पे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत साठवणूक आणि वाहतूक यांचा समावेश आहे. त्यानंतर, तीन टप्प्यांत प्रत्यक्ष लसीकरण होईल. लसीकरणासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. हे पालिकेचे कर्मचारी असतील. जंबो कोविड केंद्रात लसीकरण करण्याचा विचार आहे. पाच व्यक्तिंचे एक, याप्रमाणे ५०० पथके लसीकरणासाठी नेमले जात आहे.
---------------------
साठवणूक क्षमता
मुंबई महापालिकेने लसीकरणाचा कृती आराखडा तयार केला आहे. कांजूरमार्गसह दोन ठिकाणी लस साठवणूक केंद्र तयार करण्यात येणार आहे. दिल्लीच्या पथकानेही महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
---------------------
लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश
लस उपलब्ध झाल्यानंतर अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावरील समिती गठीत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे. मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. सर्वात आधी आरोग्यसेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, नंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण नियोजित आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
---------------------