मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी
By रेश्मा शिवडेकर | Published: May 15, 2024 08:53 AM2024-05-15T08:53:26+5:302024-05-15T08:55:47+5:30
इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेले.
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उत्तर मुंबईत भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढतीला भूमिपुत्र विरोधी बाहेरचे, मराठी विरुद्ध गुजराती असे विविध पैलू आहेत. सुरुवातीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रचाराचा संपूर्ण भर मोदी सरकारची कामगिरी, फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे भारताची होणारी वाटचाल अशा मुद्द्यांवरच होता. परंतु, इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेले.
काँग्रेसचे भूषण पाटील यांनी स्थानिक असल्याचा मुद्दा प्रचाराच्या - केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेच्या मदतीने मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केल्याने आधी एकतर्फी स्वरूप आलेल्या लढतीत रंगत आली - आहे. गोयल विरोधकांवर आक्रमकपणे टीका करत नाहीत. त्याऐवजी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ते आपली भूमिका मांडत असतात. - त्याला भूषण पाटीलही रॅप साँग, -छोट्या छोट्या जाहिरातीतून उत्तर देत असल्याचे चित्र आहे.
अंतर्गत धुसफूस
चार-साडेचार लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन दोन टर्म निवडून आलेल्या खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यावर निष्ठा असलेला कार्यकर्ता नाराज आहे. बालेकिल्ला असल्याने पक्षाने अनेकदा बाहेरच्या उमेदवारांना येथून उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस असते. ती मिटवून भाजपने जोशात प्रचाराला सुरुवात केली.
कोणाचे गारुड?
इथल्या गुजराती-मारवाडी, अल्पसंख्याक मतांचे विभाजन तसेही झालेले आहे. त्यामुळे निर्णायक मराठी मतांसाठी दोन्ही बाजूंनी आटापिटा सुरू आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ युतीमध्ये झाकली मूठ होता. येथे गुजराती-मारवाडी मते मोठ्या संख्येने असली तरी निर्णायक नाहीत. अल्पसंख्याक कायमच काँग्रेसच्या पारड्यात दान टाकत आले आहेत. उत्तर भारतीय मते दोन्ही पक्षात वाटली गेली आहेत. परिणामी इथली ५० टक्क्यांच्या आसपास असलेली मराठी मतेच निर्णायक ठरणार आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?
गोपाळ शेट्टी भाजप (विजयी) ७,०६,६७८
उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) ४,४१,४३१
सुनील थोरात वंचित बहुजन आघाडी १५,६९१