Join us

शिंदे गटाने सांगितला आकडा, भाजप-सेना महायुतीत एवढ्या जागा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 2:16 PM

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत कोणतेही सुत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचं एकमेकांच्या हातात हात घालून सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र, विरोधकांकडून शिंदे गटात आलबेल नसल्याचं सातत्याने सांगण्यात येतं. त्यात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बावनकुळे यांनी आपल्या विधानावर सारवासारवही केली. पण, ठाकरे गट आणि विरोधकांकडून हेच सत्य असल्याचं म्हटलं जातंय. त्यावरुन, आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कुणी काहीही बोलेन, पण आम्ही किती जागा घेणार हे आकड्यासह सांगितलंय. 

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत कोणतेही सुत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तर, सोशल मीडियावरुन बावनकुळे यांचा तो व्हिडिओही हटविण्यात आलाय. मात्र, हीच शिंदे गटाची लायकी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर, जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनीही या मुद्द्यावरुन शिंदे गटाला टोला लगावलाय. त्यामुळे, आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना १२५ ते १३० जागा लढवणार असल्याचं म्हटलं. 

कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून १२५ ते १३० जागा लढवणार असल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आमची आहे. ही शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्याला काही महत्त्व नाही. आमची युती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांसोबतचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 1१२५ ते १३० जागा लढवणार आहोत, असा आकडाच गायकवाड यांनी सांगून टाकला. 

दरम्यान, भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच आमच्यापेक्षा थोड्याफार जागा ते जास्त लढतील. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ ते १३० च्या खाली जागा लढणार नसल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

भास्कर जाधवांचाही शिंदे गटाला टोला

भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असे असते. बाहेर बोलताना ते एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा बोलतात. पण बैठकीतील चर्चेत मात्र ते खरे बोलले. ४८-५० जागा ते शिंदे यांना देतील आणि २४० जागा स्वत: लढवतील. पण शिंदे यांना दिलेल्या जागांपैकी पाडणार किती ते खासगीत सांगतील. जाहीरपणे सांगणार नाहीत असा टोलाही लगावला 

टॅग्स :भाजपाशिवसेनानिवडणूकचंद्रशेखर बावनकुळेसंजय गायकवाड