साक्षीदारांच्या जबाबानुसार सीबीआयकडून पुराव्यांचा शाेध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:10+5:302021-04-21T04:07:10+5:30
...त्यानंतर निष्कर्ष काढणार; १०० कोटी वसुलीचे टार्गेट प्रकरण जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ...
...त्यानंतर निष्कर्ष काढणार; १०० कोटी वसुलीचे टार्गेट प्रकरण
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) पुराव्यांचा शोध युद्धस्तरावर घेत आहे. प्रामुख्याने परमबीर सिंग व निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने तांत्रिक पुरावे व दस्तावेज गाेळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर अंतिम निष्कर्ष नोंदवून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
या दोघांव्यतिरिक्त इतरांनी आरोपांचे पूर्ण खंडन केल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या जबाबानुसार पुरावे मिळाल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास केला जाईल, असे समजते.
उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) प्रमुख सचिन वाझेला देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, या धक्कादायक आरोपाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने आतापर्यंत एकूण संबंधित आठ जणांचे सविस्तर जबाब नाेंदवले. त्यामध्ये परमबीर सिंग, वाझेसह पत्रात उल्लेख असलेले पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच देशमुख, त्यांचे खासगी सचिव संजय पलांडे, स्वीय्य साहाय्यक एस. कुंदन आणि याचिकाकर्ती जयश्री पाटील यांचा समावेश आहे. प्रत्येकाकडे साधारण किमान चार ते साडेआठ तास कसून चौकशी करण्यात आली.
* ठोस पुरावे, तांत्रिक बाबींची शहानिशा सुरू
- प्राथमिक चौकशी किमान १५ दिवसांत पूर्ण करावी, असे न्यायालयाने सांगितले हाेते. मात्र अद्याप ठोस पुरावे, तांत्रिक बाबींची शहानिशा झालेली नाही, तसेच साक्षीदाराचे जबाब पडताळून विसंगती तपासली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्याची पूर्तता केली जाईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- परमबीर सिंग यांची होमगार्डला बदली झाल्यानंतर त्यांनी १०० काेटी वसुली टार्गेटबाबतचा लेटरबॉम्ब २० मार्चला टाकला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. उच्च न्यायालयाने या प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या चौकशीतून काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...................................