Join us

मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवत खाते रिकामे

By मनीषा म्हात्रे | Published: June 07, 2024 6:55 PM

फायनान्स कंपनीतील अधिकारी सायबर ठगांच्या जाळ्यात

मुंबई: मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवत एका फायनान्स कंपानीतील अधिकाऱ्याची ८ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टिळकनगरचे रहिवासी असलेले विजय चंद्रकांत विसेरीया (४७) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला आहे. ते एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. ८ मे रोजी त्यांना एका महिलेचा कॉल आला. तिने, टेलिकॉम कंपनीतून बोलत असल्याचे सांगून, सिमकार्ड दोन तासांत बंद होणार असल्याचा बनाव केला. सिमकार्डबाबत चौकशी करताच, या सिमकार्ड क्रमांकावरून जाहिरातीसाठी त्रास दिला जात असल्याबाबत तक्रारी मिळाल्याचे सांगितले. तसेच आपल्याविरुद्ध फोर्ट परिसरात गुन्हा नोंद असून, पोलीसांना कॉल कनेक्ट केल्याचे भासवले.

विसेरिया यांना  स्काईप अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून पोलीस गणवेशात एकाने व्हिडीओ कॉल केला. दोन गुन्हे नोंद असून त्यापैकी एक मनी लाँडरिंगचा गुन्हा असल्याने लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले. अटकेच्या भीतीने त्यांना धक्का बसला. तसेच बँक खात्यात असलेले पैसे कुठून आले? याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. खात्यातील पैसे चौकशीसाठी ठगांनी दिलेल्या बँक खात्यात वळते करण्यास भाग पाडले. त्यानंतर, कॉल धारकाने कॉल कट करत चौकशी सुरु केली.

कॉल कट झाल्यानंतर अटकेच्या भीतीने त्यांनी कुणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर आरोपीने कोर्ट फीच्या नावाखाली १० लाखांची मागणी केली. अखेर, कुटुंबीय आणि मित्रांना याबाबत समजताच त्यांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. अखेर, तक्रारदार यांनी १९३० वर कॉल करून याबाबत सांगितले. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :धोकेबाजीमुंबई