मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ग्रुपने दारुपार्टी करताना खात्यातील बँक बॅलेन्स दाखवण्याची सवय एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. त्याच ग्रुपमधील एकाने तरुणाचे सिमकार्ड चोरून खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वळते करून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी झोमॅटो बॉय म्हणून करणाऱ्या रामजी कुमार प्रभू राय यादव (२०) याला अटक केली आहे.
जोगेश्वरीच्या शिवशक्ती चाळीत राहणारे श्रवण रामप्रसाद साहू (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ मार्च रोजी त्यांचा मोबाईल फुटला आणि गुगल पे अँपशी संलग्न असलेला क्रमांकाचे सिमकार्ड गहाळ झाले. ८ मार्च रोजी त्यांची नवीन सिमकार्ड घेतले. गुगल पे अँपद्वारे बँकेतील जमा राशी तपासताच खात्यातून १ लाख रुपये काढल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी, पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विजय माडये, सायबर सेलचे अधिकारी दिगंबर कुरकुटे अंमलदार अशोक कोंडे,विक्रम सरनोबत यांनी तपास सुरु केला. पथकाने तात्काळ खाते गोठवल्यामुळे ४० हजार रुपये वाचविण्यात यश आले.
पथकाने केलेल्या तपासात, रामजी कुमार प्रभूराम यादव याच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. त्यानुसार, तांत्रिक पुराव्याच्या मदतीने केलेल्या तपासात आरोपीचे लोकेशन हरियाणा आले. त्यानंतर, काही दिवसाने आरोपी मुंबईत आल्याचे समजताच पथकाने सापळा रचून जोगेश्वरीतुन बेड्या ठोकल्या आहे. त्याने ६० हजार रुपये हरियाणा मध्ये मौज मजेसाठी खर्च केल्याचे तपासात समोर आले.
सिमकार्ड चोरून पैसे केले ट्रान्सफर
यादव हा तक्रारदार यांच्या मागच्या चाळीत राहतो. ग्रुपने एकत्र दारू पिण्यास बसताना साहू अनेकदा गुगल पे द्वारे खात्यात लाखो रुपये असल्याचे दाखवत असे. खात्यातील पैसे पाहून यादवची नियत फिरली. रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणात साहू यांचा मोबाईल फुटून सिमकार्ड बाहेर पडले. हीच संधी साधून यादवने सिमकार्ड उचलून स्वतःकडे ठेवले. त्याच, सिमकार्डच्या आधारे स्वतःच्या मोबाईलमध्ये गुगल पेद्वारे खात्यातील एक लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे समोर आले.