केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली खाते होतेय रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:11+5:302021-07-21T04:06:11+5:30
मुंबई : कोरोनाचे संकट कायम असताना सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहेत. कोरोना महामारीचाही फायदा घेत ...
मुंबई : कोरोनाचे संकट कायम असताना सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहेत. कोरोना महामारीचाही फायदा घेत सायबर ठग वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत असताना केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली डॉक्टर, वकील, तसेच खासगी नोकरी करणाऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.
चेंबूर येथे राहणारे ५३ वर्षीय तक्रारदार यांना केवायसी न केल्याने सिमकार्ड पुढल्या २४ तासांत बंद होईल. केवायसीसाठी खाली नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा, असा संदेश ५ जुलै रोजी प्राप्त झाला. ते सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील एका नामांकित विमान कंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. संदेश पाहताच कोणतीही खातरजमा न करता त्यांनी लघुसंदेशातील नमूद क्रमांकावर संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी मोबाईल किंवा संगणक परस्पर हाताळण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे अॅप डाऊनलोड केले. संबंधित कॉल धारकाने केवायसी अपडेट करण्यासाठी १० रुपये ऑनलाईन भरण्यास सांगून आणखीन एक लिंक मोबाईलवर पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितली. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ६१ हजार रुपये काढण्यात आले.
अशाप्रकारे एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले आहे. बँक खाते, पेटीएम खाते, गुगल पे, फोन पे खात्याची तसेच मोबाईल नंबरची केवायसी अपडेट करायची आहे. केवायसी न केल्यास संबंधित खाते, मोबाईल क्रमांक, कार्ड बंद होईल अशी भीती घालून ही मंडळी मोबाईलवर एक लिंक पाठवून डेबिट, क्रेडीट कार्ड, बँक खात्याची माहिती भरून घेतात किंवा एखादे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडतात. तसेच मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगतात. असे केल्याने आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्या आधारे तो सायबर ठग ऑनलाईन रकमेवर हात साफ करत आहे. तसेच ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.
तसेच या ठगांनी खातेदारांना संदेश पाठवून त्याद्वारे any desk, Quick Support, Team Viewer, Aur droid सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईल व संगणकाचा अनधिकृत ताबा घेत फसवणूक करत असल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
२०३ गुन्हे दाखल
मुंबई पोलिसांच्या दफ्तरी जानेवारी ते मे दरम्यान क्रेडीट कार्ड फ्रॉड आणि फसवणूक केल्याचे २०३ गुन्हे दाखल केले आहेत.
गोपनीय माहिती शेअर करू नका
अनोळखी लिंक तसेच ॲप डाऊनलोड करू नये. कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नये. जेथे फसवणूक होतेय असे वाटत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्यास सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.