मुंबई - आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधांविरोधात काल ठेवीदारांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनानंतर घरी गेलेल्या एका ठेवीदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या ठेवीदाराचे पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल 90 लाख रुपये अडकले होते. संजय गुलाटी असे या दुर्दैवी ठेवीदाराचे नाव आहे. ते वडील सी.एल. गुलाटी, आई वर्षा गुलाटी आणि पत्नी बिंदू गुलाटी यांच्यासह ओशिवरामधील तारापोरवाला गार्डनजवळ वास्तव्यास होते. संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये इंजिनियर होते. मात्र काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्याने ते आधीच आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांची पीएमसी बँकेत चार खाती होती. मात्र पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बँकेत सुमारे 90 लाख रुपये अडकल्याने ते चिंतेत होते. दरम्यान, बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात ठेवीदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आंदोलन आटोपून घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले होते. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. दरम्यान, आरबीआयने पीएमसी बँकेमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे पीएमसी बँकेवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकानुसार, पीएमसीचे ग्राहक ४० हजार रुपये काढू शकतील. सध्या ही मर्यादा २५ हजार रुपये आहे. आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं आरबीआयनं पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत.