दलजीत बल यांच्या घरावर खातेधारकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:08 AM2020-01-06T06:08:54+5:302020-01-06T06:08:59+5:30
पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादून १०० हून अधिक दिवस उलटले असूनदेखील ग्राहकांचे पैसे परत मिळालेले नाहीत.
मुंबई : पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादून १०० हून अधिक दिवस उलटले असूनदेखील ग्राहकांचे पैसे परत मिळालेले नाहीत. यामुळे बँकेचे खातेदार अत्यंत संतप्त झालेले दिसत आहेत. रविवारी दुपारी पीएमसी बँकेचे संचालक दलजीत बल यांच्या अणुशक्तीनगर येथील घरावर खातेधारकांनी मोर्चा काढला.
अणुशक्तीनगर बस डेपो ते दलजीत बल यांच्या माउंट व्ह्यू या घरापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दलजीत बल यांच्या फोटोला पादत्राणांचा हार घातलेले फलक हातात घेत खातेधारक मोर्चात सामील झाले होते. दलजीत बल यांच्याविरोधात घोषणा देत त्यांना अटक करण्याची मागणी खातेधारकांना केली. मोर्चा दलजीत बल यांच्या घराजवळ पोहोचताच पोलिसांनी त्यांना घराच्या प्रवेशद्वाराजळच अडविले. मोर्चातील महिलांनी दलजीत बल यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी खातेधारक व पोलीस यांच्यात वाद झाला.
दलजीत बल यांच्या घराबाहेर खातेधारकांनी दलजीत यांचे फोटो जाळले. तसेच त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ खातेधारकांकडून चोर असे लिहिण्यात आले. यानंतर खातेधारकांनी दलजीत यांच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडून थाळीनाद आंदोलन सुरू केले. यामुळे अणुशक्तीनगर येथून ट्रॉम्बेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. दलजीत बलने खातेधारकांच्या पैशांवर मुंबईत आलिशान बंगले बांधले आहेत. पीएमसी बँकेत अनेक गुरुद्वाराचे पैसे अडकले आहेत, त्यामुळे दलजीत बल याने शीख समुदायाशी गद्दारी केल्याचे खातेधारकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दलजीत बल याला लवकरात लवकर अटक करावी; अन्यथा खातेधारकांकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.