‘एसटी’चे लेखाकार बढतीच्या प्रतीक्षेत, पाच महिन्यांपासून प्रक्रिया थंडावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:56 AM2024-11-04T09:56:35+5:302024-11-04T09:56:55+5:30
ST Bus News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे. पाच महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यातील ३३ लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे.
- विलास गावंडे
यवतमाळ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे. पाच महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यातील ३३ लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे.
विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग-२ (कनिष्ठ) या प्रवर्गाच्या बढतीकरिता महामंडळाने जून २०२४ मध्ये परीक्षा घेतली होती. महामंडळातीलच लेखाकार प्रवर्गातील कर्मचारी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारांनी पूर्ण प्रयत्न करून ही परीक्षा यशस्वी केली. आता महामंडळाने पुढील प्रक्रिया सुरू केली नाही. महामंडळाच्या जवळपास प्रत्येक विभागातील लेखाकारांचा यामध्ये समावेश आहे. सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन या परीक्षेसाठी लेखाकारांना पात्र ठरविण्यात आले होते. परंतु, अद्याप त्यांना बढती दिलेली नाही.
आर्थिक नुकसान
विभागीय लेखाकार म्हणून बढती मिळाल्यास एक वेतनवाढ होते. यामुळे दरमाह वेतनात ७०० ते ८०० रुपये अधिक मिळतात.
बढतीच मिळाली नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. मागील पाच महिन्यांपासून त्यांना हे नुकसान सहन करावे लागत आहे. बढती प्रक्रिया स्थगित तर केली नाही ना, अशी शंका परीक्षा पास उमेदवारांमधून उपस्थित केली जात आहे.
या विभागातील लेखाकार प्रतीक्षेत
ठाणे, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अकोला, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, अमरावती, धुळे, गडचिरोली, पुणे, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव आदी विभागांतील परीक्षा पास लेखाकार बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रभारावर कारभार
- महामंडळाच्या राज्यातील विविध विभागांत विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग-२ या प्रवर्गातील पदे रिक्त आहे.
- लेखाकारांकडे प्रभार देऊन लेखा विषयक कामे ढकलली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी परीक्षा घेतलेल्या लेखाकारांमधून या जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- याविषयी उमेदवारांनी महामंडळाच्या यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केला, याची दखल घेतली जात नसल्याची ओरड आहे.