लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेली तेहेतीस वर्षे फरार असलेल्या आरोपीला मंगळवारी पोलिसांनी गजाआड केले. अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेरखान अब्दुल रेहमान खान (५६) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो अंधेरी पूर्वच्या मोगरापाडा परिसरात राहत होता. त्याच्यावर अंधेरी पोलिसांनी १९८८ मध्ये भारतीय दंडविधान संहिता कलम ३२६ आणि ११४ अंतर्गत मारामारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज कट्टे, पोलीस उपनिरीक्षक मलगुंडे आणि पथकाने खानच्या मुसक्या आवळल्या. त्याला महानगर दंडाधिकारी रेल्वे मोबाइल न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याचे बेळगे यांनी सांगितले.