Join us

फेसबुक लॉगइनच्या मदतीने आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:06 AM

हॉल बुकिंगच्या नावाखाली अनेकांचे पैसे घेऊन पळालेल्या आरोपीला बांगुरनगर पोलिसांनी रविवारी अटक केली.

मुंबई : हॉल बुकिंगच्या नावाखाली अनेकांचे पैसे घेऊन पळालेल्या आरोपीला बांगुरनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. मागे कोणताही पुरावा न सोडणाऱ्या या आरोपीने त्याचे फेसबुक खाते लॉगइन केल्यामुळे पोलीस पथक त्याच्यापर्यंत पोहोचले आणि तो गजाआड झाला.आकाशी पवनकुमार शर्मा (३१) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा चंदिगढचा राहणारा आहे. मालाड पश्चिमच्या गोल्डन लीफ बँक्वेट हॉलमध्ये मॅनेजर म्हणून तो काम करत होता. गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमांसाठी हॉलच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे पैसे त्याने गोळा केले होते. ही रक्कम जवळपास साडेचार लाख रुपये होती. ती घेऊन शर्मा अचानक गायब झाला. याची तक्रार बांगुरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र शर्माने त्याची खरी माहिती कोणालाच दिली नसल्याने त्याला शोधण्यात पोलिसांना अडथळा येत होता. पोलीस उपनिरीक्षक शीतल गायकवाड या प्रकरणी तपास करत होत्या. त्या वेळी हॉलच्या संगणकामध्ये शर्माचे फेसबुक लॉगइन त्यांना सापडले. त्यामुळे त्याच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून तो चंदिगढला असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांनी कॉन्स्टेबल नीतेश सूर्यवंशी, अविनाश चव्हाण या पथकासह चंदिगढला रवाना होत शर्माला अटक केली. त्याला रविवारी मुंबईत आणण्यात आले. हॉलमधील ग्राहकांचे पैसे लंपास करून शर्माने मुंबई सोडली. चंदिगढला एका आंतरराष्ट्रीय बीपीओमध्ये तो काम करत होता, अशी माहिती त्याने तपास अधिकाऱ्यांना दिली आहे.