पळ काढल्यानंतर ११ घरफोडी, हत्येचा प्रयत्न, गुन्हे शाखेची कारवाई
कारागृहातून सीसीटीव्ही वायरच्या साहाय्याने पसार झालेला आरोपी जेरबंद
पळ काढल्यानंतर ११ घरफोडी, हत्येचा प्रयत्न, गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आधारवाडी येथील कारागृहातील सीसीटीव्ही वायरच्या साहाय्याने भिंतीवरून पसार झालेल्या आरोपीला चार वर्षांनी नवी मुंबईतून बुधवारी अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने ही कारवाई केली. डेव्हिड मुर्गेश देवेंद्र उर्फ विनायक (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, कारागृहातून पळ काढल्यानंतर त्याने कन्याकुमारी, तमिळनाडूमध्ये घरफोडी, हत्येचा प्रयत्न केला. तेथे त्याच्याविरुद्ध ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनायक हा बिस्लेरी डिलिव्हरीचे काम करतो. तो महात्मा पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल जबरी चोरीच्या गुह्यांत कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायबंदी होता. २३ जुलै २०१७ रोजी तो सीसीटीव्ही वायरच्या साहाय्याने कारागृहाच्या भिंतीवर चढून पसार झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तो नवी मुंबईच्या उलवे भागात ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ४ चे जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे आणि पोलीस अंमलदार यांनी चार दिवस पाळत ठेवून बुधवारी त्याला पकडले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जबरी चोरी, घरफोडी तसेच चोरीचे एकूण १५ गुन्हे महाराष्ट्रातील विविध भागांत केल्याची कबुली दिली. तसेच कारागृहातून पळून गेल्यानंतर कन्याकुमारी, तमिळनाडूमध्ये ११ घरफोडी, हत्येचा प्रयत्न केल्याचेही सांगितले.
यादरम्यान त्याला तामिळनाडूच्या अंजुग्राम पोलिसांनी अटक केली. तो त्यांच्याही पोलीस कोठडीतून पळून गेला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.