बोरिवली लॉकअपमधील घटना, गुन्हा दाखल
विडी दिली नाही म्हणून आरोपीने लॉकअपमध्येच फोडून घेतले डोके
बोरीवलीतील घटना ; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला विडी दिली नाही म्हणून त्याने लॉकअपमध्ये भिंतीवर डोके आपटून घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी बोरीवली लॉकअपमध्ये घडली. अयाज जुमई खान (१९ ) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या विरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलिसांनी सोमवारी पहाटे चोरीच्या गुन्ह्यात अयाज जुमई खान (१९) व मोहम्मद इम्रान मोहम्मद नजीर खान (२९) यांना अटक केली. त्यांना दाेन दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली. दोघांना बोरीवली जनरल लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी साडेतीन पासून इम्रान आणि अयाजने तेथे कार्यरत असलेले बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दशरथ परब यांच्याकडे तंबाखू आणि विडीची मागणी केली. त्यांनी लॉकअपमध्ये विडी मिळत नसल्याचे सांगून दाेघांना शांत राहण्यास सांगितले.
मात्र अयाजने रागाच्या भरात ‘मैं सर फोड के लेगा’, अशी धमकी दिली. परब यांनी याबाबत लॉकअपच्या सहाय्यक फाैजदारांसह गोरेगाव पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर इम्रान झोपायला गेला. मात्र अयाजकड़ून मागणी सुरूच हाेती. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आयाजने भिंतीवर डोके फोडून घेतल्याचे आतील आरोपीकडून समजताच परब यांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. याबाबत वरिष्ठांना कळवून अयाजला कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले.
अयाजने डोके फोडून घेतल्याप्रकरणी परब यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने डोके फोडून घेतल्याच्या वृत्ताला बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कालेकर यांनी दुजोरा दिला.
...........................................