Join us

बोरिवलीतील तुरुंगात आरोपीची आत्महत्या; पुण्यातून घेतले होते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 9:24 AM

याबाबत परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. 

मुंबई : बोरिवली येथील तुरुंगात दीपक जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून ताब्यात घेतलेल्या जाधवने बोरिवली जनरल लॉकअपध्ये अंडरविअरच्या इलॅस्टिकचा वापर करत गळफास घेतला. याबाबत परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. 

जाधव याला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  दीपक जाधव हा बोरिवली पश्चिमच्या डॉन बॉस्को शाळेजवळ रामचंद्र भंडारी चाळीत राहात होता. त्याला न्यायालयाने २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दीपक जाधववर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करत आहे. 

दीपकच्या भावाचा पोलिसांवर आरोप 

 दीपकचा भाऊ तानाजी जाधव यांनी आपल्या भावाला पोलिसांनी छळ करून मारल्याचा आरोप केला आहे.  शुक्रवारी दीपकला जामीन मिळणार होता. आम्ही येथे आलो असता दीपकने फाशी घेतल्याचे आम्हाला सांगण्यात आले, असे तानाजी यांनी सांगितले. 

 पोलिसांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच हॉस्पिटल, पोलिस ठाणे आणि तुरुंगात आम्हाला पोलिसांनी फिरवले. 

 भावाचा मृतदेह परस्पर विच्छेदनासाठी पाठवला. त्यामुळे बोरिवली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तानाजी यांनी केली.

आम्ही संबंधित आरोपीला कोर्टात सादर करून त्याचा ताबा घेतला होता. या घटनेप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत. - निनाद सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरिवली पोलिस ठाणे

टॅग्स :मुंबईपुणेपोलिस