मुंबई: जुन्या भांडणाचा राग मनात धरून झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत ३८ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करत कैलास बनसोड (५०) हा पसार झाला होता. मात्र खार पोलिसांनी मागावर राहत गुजरातमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. ज्यासाठी पोलिसांनी जवळपास १०० ते १२५ सीसीटीव्ही फुटेज पडताळल्याची माहिती आहे.
खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यादव (३८) हे खार पश्चिमच्या मेट्रो डेकोरेशन शॉप समोर बसले होते. त्यावेळी आरोपी बनसोड त्याठिकाणी आला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने यादव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील झाड कापण्याच्या हत्याराने फिर्यादीच्या मानेवर व दोन्ही हातावर जोरदार वार करून त्यांना गंभीर दुखापत केली आणि तिथून पसार झाला.
याप्रकरणी २६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन आणि खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपशिका वारे, निरीक्षक वैभव काटकर(गुन्हे) , उपनिरीक्षक प्रदीप पाटील व पथक यांनी नमूद आरोपीचा घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाठलाग केला. ज्यात बनसोड हा बांद्रा स्टेशनवरून दादर, मुंबई सेंट्रल, नागपाडा, आग्रिपाडा, चर्चगेट , मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, सी एस एमटी स्टेशन असे फिरून शेवटी बांद्रा टर्मिनस येथे आला.
तो अवध एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे निष्पन्न होताच ती अंधेरी,बोरिवली,वापी, सुरत येथे थांबत असल्याची माहिती मिळवत सदर रेल्वे स्टेशनचे फूटेज तपासले गेले. ज्यात बनसोड गुजरातच्या सुरत येथे उतरल्याचे दिसून आले. आरोपी मानसिक तणावामध्ये असल्याने तो पायी फिरत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी १०० ते १२५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी करण्यात आली. आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार नसून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.