मुंबई : पोक्सो कायद्यांतर्गत पवई पोलिसांकडून अटक करण्यात आलेला विकास पवार (२०) हा दिंडोशी कोर्टाच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडला. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला असून यात त्याचा मृत्यू झाला. त्याने उडी मारली की हा अपघात होता, याची चौकशी सध्या कुरार पोलीस करत असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पवार याला चार दिवसांपूर्वी पवई पोलिसांनी अटक केली होती. २०१५ साली त्याने एका पाच वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यानुसार, चार वर्षांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पवारचा ‘इन कॅमेरा’ जबाब दिंडोशी सत्र न्यायालयात नोंदविण्यात आला. त्यानंतर, तो बाहेर आला आणि त्याने सोबत असलेल्या पोलीस गार्डच्या हाताला जोरदार झटका दिला. त्यानंतर कोणालाही काही समजायच्या आतच तो धावतच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला आणि तिथून त्याने खाली उडी मारली.या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे निदान केले. याची माहिती कुरार पोलिसांनादेखील मिळाली आणि त्यांनी।घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोपपाच वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप पवारवर होता. त्यानुसार, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तो घाटकोपरचा रहिवाशी असून, आता आपण कधीच सुटणार नाही, या भीतीने त्याने आत्महत्या केली की पळून जाण्याच्या प्रयत्नात जीव गमावला, याबाबत चौकशी सुरू आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
आरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 4:58 AM