Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला दोन दिवस उलटले तरी आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. सैफवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क आहेत. अशातच सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादर परिसरात पोचोहल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यावेळी त्याने एका दुकानातूनहेडफोन खरेदी केल्याचे समोर आलं आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानादाराकडून यासंदर्भात माहिती घेऊन पुढील तपास सुरु ठेवला आहे.
अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री एका अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हापासून आरोपी फरार असून मुंबई पोलिसांच्या विविध तपास पथकांकडून त्याचा शोध सुरु आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे विविध सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपीने वांद्रे स्थानक गाठले. त्यानंतर रेल्वेने तो दादरला पोहोचला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी दादरमधील लक्ष्मी हॉटेलजवळील इकरा नावाच्या मोबाईल फोन दुकानामधून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीचा माग काढला जात आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला लवकरच पकडले जाईल, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये हल्लेखोर बिंधास्त असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपीने सकाळी ९ वाजता हेडफोन खरेदी केले होते. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी कपडे बदलताना दिसत आहे. हल्लेखोर शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या शर्टात दिसत आहे.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना सैफ अली खान प्रकरणातील संशयिताचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, जे १२ जानेवारीचे असून ते वर्सोवा भागातील असल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्हीमध्ये संशयित बूट चोरताना दिसत आहे. दुसरीकडे, आरोपींना पकडण्यासाठी मुंबईचे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेने ४० हून अधिक पथके तयार केली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध भागात ते आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.