Join us

फोटो, पेपर स्प्रे, फटाके अन्... बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी शूटर्संनी अशी केली होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:34 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आलं आहे.

Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवलेली असतानाही वांद्रे येथे गोळीबार करुन मारण्यात आलं. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक कण्यात आली असून तिसरा मुख्य आरोपी फरार आहे. संपूर्ण नियोजन करुन सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. आरोपी अनेक महिन्यांपासून सिद्दीकींच्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचेही उघड झालं आहे.

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.तसेच वांद्र्यासारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या इतक्या मोठ्या हल्ल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. 

महिन्याभरापासून पाळत आणि हत्येचा कट

हत्येच्या काही महिन्यांपूर्वी आरोपी धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि गुरनैल सिंग यांनी सिद्दीकीच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी दीड ते दोन महिने मुंबईत मुक्काम करून सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची चाचपणी केली.

कुर्ल्यात भाड्याने घेतली खोली

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हल्लेखोरांना ५०,००० रुपये आगाऊ दिले आणि हत्येनंतर आणखी दोन लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. सर्व आरोपी सप्टेंबरच्या सुरुवातीस कुर्ला येथे एक खोलीत १४ हजार रुपये भाड्याने राहू लागले. खोलीसाठी त्यांनी खोटी कागदपत्रे दिल्याचेही समोर आलं आहे. ही खोली मिळवून देण्यासाठी  झिशान अख्तरने त्यांना मदत केली होती.

ओळख पटवण्यासाठी दिले बाबा सिद्दीकींचे फोटो

पोलिसांनी सांगितले की, धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि गौतम यांना सिद्दीकीचे फोटो ओळखण्यासाठी दिले होते. तसेच सप्टेंबरपूर्वी हत्येचा कट रचण्यात आला होता. शिवकुमार गौतमने सिद्दिकींवर सहा गोळ्या झाडल्या  आणि त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या.

आरोपींना पकडलं

आरोपी सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर तिथून जाणाऱ्या एका देवीच्या मिरवणुकीत गर्दीत घुसले होते. सुरुवातीला लोकांना ते चोर असल्याचे वाटले. हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर पेपर स्प्रे मारला होता आणि जवळच्या उद्यानात पळ काढला. वायरलेसवरुन याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी उद्यानाला वेढा घातला आणि दोघांना पकडले. धर्मराज कश्यपला भिंतीवरुन उडी मारुन पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला ते जमलं नाही. तर गुरनैल सिंगने बंदूक खाली टाकून आत्मसमर्पण केले. मात्र गोळ्या झाडणारा शिवकुमार गौतम पळून जाण्यात यशस्वी झाला.

सिद्दीकींच्या सुरक्षेत अपयश

मुलगी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच रात्री ९.३०  वाजता हा हल्ला झाला. एकच पोलीस रक्षक असतानाही हल्लेखोरांनी फटाक्यांचा आवाज आणि गर्दीचा फायदा घेतला. सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसावर आरोपींनी पेपर स्प्रे फवारल्याने तोही काही करु शकला नाही. "सिद्दीकींकडे सुरक्षेसाठी तीन पोलीस होते. दोन दिवसा आणि एक रात्री. त्यांनी आम्हाला आलेल्या कोणत्याही धमकीची माहिती दिली नाही. हल्लेखोरांनी फटाके फोडण्याचा आणि गर्दीचा फायदा घेतला," असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून पोलिसांनी दोन ग्लॉक ऑटोमॅटिक पिस्तूल, २८ गोळ्यांनी भरलेली चार मॅगझिन, चार मोबाईल, आधार कार्ड आणि एक बॅग जप्त केली आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस