Join us

शिक्षेविरुद्ध आरोपीची हायकोर्टात धाव

By admin | Published: December 29, 2015 2:16 AM

कुर्ला येथील ५वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या जावेद शेखने उच्च न्यायालयात अपील केले आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने

मुंबई : कुर्ला येथील ५वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या जावेद शेखने उच्च न्यायालयात अपील केले आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्याचे अपील दाखल करून घेतले आहे. १९ जून २०१० रोजी नेहरूनगरच्या वत्सलाताईनगर झोपडपट्टीमधील एका रिकाम्या झोपडीत ५वर्षीय मुलीचे शव आढळले. ही मुलगी ५ जून २०१०पासून हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शेखचे अपील दाखल करून घेतले आहे आणि लवकरच त्यावर सुनावणी सुरू होईल, अशी माहिती शेखचे वकील अमिन सोलकर यांनी दिली.स्थानिक केबल आॅपरेटरकडे काम करणारा शेख घटनेच्या वेळी कामावर होता. त्या दिवशी त्याने एका पोलिसाकडूनही केबलच्या बिलाचे पैसे घेतले होते, असा बचाव शेखने ट्रायल कोर्टात घेतला होता. त्यासाठी त्याने बचावपक्षाचे चार साक्षीदारही न्यायालयापुढे हजर केले होते. तसेच त्या दिवशीची सगळी बिलेही त्याने न्यायालयात सादर केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या पुराव्यांना दुजोरा देणारे अन्य पुरावे रेकॉर्डवर न आणल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत व डीएनए रिपोर्ट लक्षात घेत शेखला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी) - शेखचे वकील अमिन सोलकर यांनी अपीलामध्ये काय नमूद करण्यात आले आहे, याची माहिती दिली नाही. ट्रायल कोर्टात जी भूमिका घेतली आहे, तीच भूमिका उच्च न्यायालयापुढे मांडणार असल्याचे सोलकर यांनी सांगितले.