कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; २०१८ मध्ये केली होती अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:30 IST2025-01-29T16:20:56+5:302025-01-29T16:30:09+5:30
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; २०१८ मध्ये केली होती अटक
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.
ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता या सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपींना २०१८ ते २०१९ या दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. आरोपी आतापर्यंत तुरुंगात होते. हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, यामुळे आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले. या तपासामध्ये प्रगती नसल्यामुळे आरोपी जामानासाठी पात्र असल्याचा निर्वाळा न्यायालयाकडून दिला.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी सकाळी चालण्यासाठी जात होते, यावेळी दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येऊन अचानक गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पानसरे यांचा चार दिवसांनी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सुरुवातीला कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिसांनी तपास केला. पण नंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या देखरेखेखालील विशेष तपास पथककडे वर्ग करण्यात आले.