मुंबई : बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निमेश चौटालिया असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्याजवळ ५०० रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी सादर केलेले पुरावे तथ्यहीन आढळून आल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली.
शाद मोहम्मद शेख याने आपला विवो व्ही १७ प्रो हा मोबाईल ओएलएक्स या संकेतस्थळावर २२ हजारांना विकायला काढला. निमेश याने शेख याच्याशी संपर्क साधत मोबाईल विकत घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. शेख याला निमेश याने एलबीएस मार्ग कुर्ला येथे भेटायला बोलावले. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी दोघे भेटले त्यावेळी निमेश ने मोबाईल च्या बदल्यात रोख रक्कम शेख याला दिली. त्यातील ५०० च्या नोटा बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर शेख याने आपल्या काकाला त्या ठिकाणी बोलावले खोट्या नोटा आढळून येताच त्याने पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर पोलिसांनी निमिश याला अटक केली. खटल्यादरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यात तफावत आढळून आल्याने न्यायाधीश बी डी शेळके यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.