मुंबई : २०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याची मुंबईउच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली. मुनीब गेली १२ वर्षे तुरुंगात होता.
उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले. विशेष न्यायालयाने मेमन याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर मेमन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने त्याला दिलासा दिला.
सप्टेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे दर्शविणारे प्रथमदर्शनी पुरावे नाहीत, असे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
त्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे...
न्यायालयाने विशेष न्यायालयाला खटला डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मेमनचे वकील मुबीन सोलकर यांनी न्यायालयाला सांगितले की, ४२ वर्षांचा टेलर सुमारे १२ वर्षे तुरुंगात आहे. जलदगतीने खटला चालविण्याच्या त्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे.
किमान जामिनावर त्याची सुटका करण्यात यावी. १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट झाला. त्यात एकजण जखमी झाला आणि एक बॉम्ब निकामी केला.
महाराष्ट्र एटीएसने या बॉम्बस्फोटप्रकरणी आठजणांना अटक केली. त्यात मेमनचाही समावेश होता.