भिंतीवरून उडी घेत आरोपी झाला पसार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:31 AM2023-11-22T11:31:22+5:302023-11-22T11:32:01+5:30
काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमधील बाथरूमच्या भिंतीवरून उडी घेत आरोपी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस हवालदार विशाल उत्तम भारस्कर (४१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. एटीएसने फसवणुकीसह अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजु अबुल हाशिम शेख (२९) याला गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी अटक केली. ६ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान आरोपीने गुन्हाही कबूल केला. २९ सप्टेंबर रोजी त्याला १० महिन्यांची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
आरोपी पळून गेल्याने खळबळ
आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली. एटीएसच्या पथकाने काळाचौकीसह कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन, शिवडी रेल्वे स्टेशन, सी.एस.टी. रेल्वे स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस व टिळक नगर रेल्वे स्थानक, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र, आरोपी मिळून आला नाही. अखेर, याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निकालामध्ये आरोपीच्या प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा-२, गु.अ.वि. मुंबई, कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आला होता. आरोपीने शिक्षा पूर्ण भोगल्यानंतर त्याला १ नोव्हेंबर रोजी एटीएसच्या काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.