Join us  

स्वत:ला वाचविण्यासाठी माझ्यावर केले आरोप; परमबीर सिंह आणि वाझेंवर अनिल देशमुखांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:24 AM

आपल्यावरील सर्व आरोप हे तपासयंत्रणेच्या केवळ ‘इच्छा आणि कल्पनेवर’ आधारित आहेत, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी स्वतःला वाचविण्यासाठी हातमिळवणी करत माझ्यावर आरोप केले, असे भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने सीबीआयला देशमुखांच्या जामीन अर्जावर १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्यावरील सर्व आरोप हे तपासयंत्रणेच्या केवळ ‘इच्छा आणि कल्पनेवर’ आधारित आहेत, असे म्हणत देशमुख यांनी सीबीआयने ज्या जबाबांचा आधार घेऊन गुन्हा नोंदवला आहे, त्या विधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह केले आहे. अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी अटक केली. मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामीन आदेशावर स्थगिती देण्याची ईडीची विनंती न्यायालयाने मान्य करत १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली. 

देशमुख यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचाही गुन्हा नोंदवला आहे. आपल्यावरील गुन्हा केवळ तपास यंत्रणेच्या इच्छाशक्तीवर आधारित आहे. सीबीआयने ज्या लोकांच्या जबाबांचा आधार घेऊन गुन्हा नोंदवला आहे, त्यांच्या विश्वासार्हतेवर संशय आहे, असे देशमुख यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. संपूर्ण प्रकरण परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या जबाबांवर आधारित आहे. वाझे स्वतः अनेक प्रकरणांत अडकलेला आहे. तो स्वतः बार मालकांकडून पैसे वसूल करायचा, हे सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत. त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला सेवेत रुजू करण्यात आले. दोघांनीही स्वतःला वाचविण्यासाठी हातमिळवणी करत आपल्यावर आरोप केले, असे देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवलेल्या निरीक्षणांचा आधार सदर प्रकरणात घ्यावा, अशी विनंती देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयाला केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अनिल देशमुख