Join us  

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला अटक; मित्राने फोन चालू करताच सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 6:37 AM

वरळीत अपघात घडवल्यानंतर मिहीर शहा त्याचे लपून राहण्याचे ठिकाण सतत बदलत होता

मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात अखेर दोन दिवसांनी आरोपी मिहीर शहाला विरार येथून अटक करण्यात आली. त्याच्या मित्राने काही वेळ मोबाइल सुरू केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीर शहाची आई आणि दोन मोठ्या बहिणींसह एका मित्राला शहापूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले आहे.

वरळीत अपघात घडवल्यानंतर मिहीर शहा त्याचे लपून राहण्याचे ठिकाण सतत बदलत होता. त्याने बीएमडब्ल्यू गाडीखाली चिरडून कावेरी नाखवा (४५) यांना चिरडल्यापासून पोलिस पथके त्याच्या मागावर होती. मिहीर अपघातानंतर गोरेगाव येथील प्रेयसीच्या घरी पळाला. याची माहिती होताच मिहीरची बहीण

पूजाने गोरेगाव येथील मिहीरच्या प्रेयसीचे घर गाठले. तेथून पूजा मिहीरसोबत बोरिवली येथील घरी आली. त्यानंतर मिहीर पूजा, त्याची दुसरी बहीण किंजल आणि आई मीना यांच्यासह ठाणे, नाशिक आणि शहापूर येथील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लपत होता. अपघात घडला तेव्हा शहा कुटुंब मर्सिडीजमधून प्रवास करत होते. अपघातानंतर संपूर्ण कुटुंब आणि त्याचा मित्र शहापूरच्या रिसॉर्टमध्ये लपले होते.

असा सापडला...

आरोपी मिहीरचा पालघरचा मित्र सोमवारी रात्रीच शाहपूरला गेला. तेथून मिहीरला घेऊन तो मंगळवारी विरारला आला. मंगळवारी मिहीरच्या मित्राने सकाळी काही वेळ त्याचा मोबाइल चालू करून पुन्हा बंद केला. त्याच्या मित्राचा मोबाइल चालू होताच त्याचे ठिकाण सापडले.

पथकाने विरार फाटा येथून मिहीरच्या मुसक्या आवळेल्या आणि रात्री पोलिस ठाण्यात आणून रीतसर अटक केली. वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

समोरासमोर चौकशी

शहा कुटुंबाच्या आलिशान कारचा चालक राजऋषी बिडावत दिशाभूल करत असल्याने त्याची आणि मिहीरची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तो नशेतच...

अपघातापूर्वी आरोपी मिहीरने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केले. त्याचे बिल आणि सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच अपघातावेळी तो नशेत असल्याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी