लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:20 AM2024-05-02T04:20:24+5:302024-05-02T04:26:25+5:30
तुरुंगातील शौचालयातील खिडकीला बांधली पट्टी, पोलिस आयुक्तालयातील घटना
मुंबई : बॉलीवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांना शस्त्रे पुरविणाऱ्या बिश्नोई गँगच्या सदस्य अनुजकुमार थापन याने बुधवारी आत्महत्या केली. पोलिस आयुक्तालयातील लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयातील खिडकीला चादरीच्या पट्टीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला. या घटनेमुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
थापन हा बिश्नोई गँगचा सदस्य होता. गुन्हे शाखेने सोनू बिश्नोई आणि थापनला शस्त्र पुरविल्याप्रकरणी अटक केली होती. गुन्हेगार दोघेही मूळचे पंजाबचे रहिवासी असून सोनू एका किराणा दुकानात काम करतो, तर थापन क्लीनर म्हणून काम करायचा. दोघांनी १५ मार्च रोजी दोन बंदूक, चार मॅगझिन आणि ४० काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपीना पुरविली.
आरोपींवर मोक्का लावल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडून एसीपी दत्तात्रय नाळे यांच्या विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. आरोपी ८ मेपर्यंत पोलिस कोठडीत होते.
आरोपींना पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. अनुज थापनला इतर १० आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुन्हे शाखेने पोलिस चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. सकाळी पोलिस राउंड झाला, त्यावेळी सहा आरोपी कारागृहात होते.
बिश्नोई गँगचा महत्त्वपूर्ण दुवा...
अनुज थापनचे बिश्नोई गँगशी थेट संबंध होते. त्यामुळे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार, सीआयडी आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत, तसेच अन्य कैद्यांकडेही चौकशी सुरू आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा अन् सुरक्षा गार्ड तरीही?
लॉकअपमध्ये एकूण तीन शौचालये आहे, तसेच बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच सुरक्षा गार्डही तैनात आहे. एवढ्या महत्त्वपूर्ण प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुपारी बारा ते एकच्या सुमारास चादरीचा कोपरा फाडून त्याच्या साहाय्याने शौचालयाच्या खिडकीतील जाळीला गळफास घेतला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने अन्य आरोपीने डोकावले, तेव्हा अनुज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.