Join us  

धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग आरोपीस ५० तासांत अटक

By नितीन जगताप | Published: June 30, 2023 10:42 PM

रेल्वे पोलिसांची कारवाई  

मुंबई :  २४ जून रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड हून एक महिला चर्नी रोडला येत असताना मुंबई सेंट्रल ते ग्रँट रोडच्या दरम्यान एका तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये चढून तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांनी ५० तासांत तांत्रिक तपासावरून आरोपीस अटक केली आहे. रोशन गिरीश पटेल असे आरोपीचे नाव आहे. 

 शुक्रवारी रात्री मालाड येथे राहणारी २४ वर्षीय तरूणी कामानिमित्त चर्नी रोड येथे जाण्यासाठी चर्चगेट दिशेकडील लोकल पकडली. ग्रॅण्ट रोड स्थानक आले असता, एका तरूणाने संबंधित तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरूणाने कमी वेग असलेल्या धावत्या लोकलमधून उडी घेऊन पळ काढला. त्यानंतर पीडित तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू होता.  पोलीस  निरीक्षक प्रविण भगत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ ०४ टिम ( तांत्रिक टिम ०१ व फिल्ड वर्क टिम ०३) तयार करुन तात्काळ रवाना केले.  

०४ टिम मधिल अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी दिले सूचनांप्रमाणे गुन्हा दाखल झालेपासून तांत्रिक व इतर पुरक तपास याद्वारे आरोपीस मुंबई शहर परिसर, ठाणे ग्रामीण परिसर, मिरा-भाईंदर परिसर येथे कसोशीने अहोरात्र शोध घेतला व अखेरीस त्यास विरार येथून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. 

या कामगिरीमध्ये लोहमार्ग  पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहा. पोलीस आयुक्त बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक   प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक  पी. पी डांगे, एम. एस. घरटे (तपासी अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक व्ही. जी. राठोड ,  एस. के. डोके, ट्रेसिंग पथक व सीसीटीव्ही फुटेज पथक यांच्या मदतीने कामगीरी बजावली .