साकीनाका पोलिसांची कारवाई : अभिनेत्रीसह तरुणाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका अभिनेत्रीसह मोटारसायकल विक्रीसाठी इच्छुक तरुणाचे पैसे ऑनलाइन लंपास करणाऱ्या भामट्याला साकीनाका पोलिसांच्या पथकाने राजस्थानच्या जंगलातून अटक केली.
यू कमरुद्दीन खान (३८) असे अटक आरोपीचे नाव आहे. २०१९ मध्ये वाइनच्या ऑनलाइन खरेदीदरम्यान एका माॅडेल, अभिनेत्रीची २० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली हाेती. तर एका तरुणालाही ओएलएक्समार्फत मोटारसायकल विक्री करताना ३३ हजार ५०० रुपयांना फसविण्यात आले हाेते. या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुनीता भोसले या सायबर पोलिसांसोबत चौकशी करीत होत्या.
खान हा राजस्थानमधील एका जंगलातून लोकांची फसवणूक करीत असल्याची माहिती भोसले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाला घेऊन त्या राजस्थानला पोहोचल्या. तेथे साध्या वेशात वावरत त्यांनी आरोपीचा माग काढून त्याला अटक केली.
* महिला पाेलीस अधिकऱ्याने केले पथकाचे नेतृत्व
याच प्रकरणात बरकत शहाबुद्दीन यालाही राजस्थान पोलिसांकडून सुनीता भोसले यांच्या पथकाने ताब्यात घेऊन मुंबईत आणले. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या अटकेमुळे आणखी काही ऑनलाइन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळेल, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तवली. जंगलात लपून बसलेल्या आराेपीला अटक करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याने यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले.
...........................