Join us

पालिका भरती घोटाळ्यातील आरोपींना कोठडी

By admin | Published: January 05, 2017 4:11 AM

पालिका नोकर भरती घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या डी वॉर्डचा मुकादम देवजी प्रेमजी राठोडलाही ताडदेव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली

मुंबई : पालिका नोकर भरती घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या डी वॉर्डचा मुकादम देवजी प्रेमजी राठोडलाही ताडदेव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली, तसेच अटकेत असलेल्या चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ताडदेव परिसरात हर्षा कानजी हेलिया (४२) या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचे मयत आजी मथू आणि अविवाहित काका प्रवीण यांच्या जागेवर बोगस उमेदवार दाखवून नोकरी मिळविण्यात आली होती. प्रवीण विवाहित नसताना, निर्मला कुणाल जोगदिया या महिलेने बनावट कागदपत्रे सादर करून, त्यांची पत्नी म्हणून नोकरी मिळवली, तर आजी मथूच्या जागेवर मनीषा हेलिया यांनी नोकरी मिळवली. या प्रकरणी देवजी प्रेमजी राठोड, कुणाल जोगदिया, चेतन हेलिया आणि सन्नी विजुडा यांच्यासह रतन जेसिंग हेलिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. सोमवारी या प्रकरणातील जोगदिया, हेलिया आणि विंजुडाला ताडदेव पोलिसांनी अटक केली. या रॅकेटने मयत आजी आणि काकांची खोटी वारसदार हजर केली. यात पालिकेच्या डी वॉर्डमध्ये काम करत असलेल्या राठोड यामागील मुख्य सूत्रधार होता. त्याच्या सहीनेच ही कागदपत्रे पुढे जात होती. गुन्हे शाखेने २०१५ मध्ये हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, देवजी राठोडसह दहा जणांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात मुख्य ६ ते ७ जणांसह जवळपास ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे. यात जामिनावर बाहेर असलेल्या राठोडला ताडदेव पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिराने बेडल्या ठोकल्या. चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांनाही ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राठोड हा डी वॉर्डचा एओ म्हणून काम करत होता, तर कुणाल जोगदिया आणि चेतन हेलिया हे क्लार्क म्हणून कामाला होते. या प्रकरणातील सफाई कामगार असलेला सन्नी विंजुडा दलालीचे काम करत होता. त्याने बोगस कागदपत्रे सादर करून पत्नीलाही नोकरीला लावले होते. हा या सर्वांना बोगस उमेदवार पुरविण्याचे काम करायचा. अवघ्या पाच ते सहा लाखांत गरजू उमेदवारांना हेरायचा आणि त्यांना खोटे वारसदार दाखवून नोकरी मिळवून द्यायचा. त्यापुढे बनावट कागदपत्रे बनविण्यात मास्टर असलेल्या जोगदियावर बनावट कागदपत्रे बनविण्याची जबाबदारी होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, राठोड त्यांच्यावर सह्या करून ते पुढे पाठवत असे. ताडदेव पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. शांत झालेले प्रकरण तपासात आल्याने, पालिकेच्या वरिष्ठांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)