Join us

आयुक्तांविरोधात छळाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2016 4:28 AM

राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील अधिसेविका (उच्चश्रेणी) प्रीती हर्ष विग यांनी योजनेच्या आयुक्तांविरोधात मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील अधिसेविका (उच्चश्रेणी) प्रीती हर्ष विग यांनी योजनेच्या आयुक्तांविरोधात मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडेही केल्याचे विग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विग यांनी सांगितले की, काही बडे अधिकारी लैंगिक शोषण करण्यासाठी आयुक्तांना हाताशी धरून माझा मानसिक छळ करीत आहेत. त्यासाठी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. या प्रकरणाला आयुक्तांचीही साथ आहे. कारण माझ्याविरोधातील ज्या व्यक्तीच्या नावे तक्रारी केल्या जात आहेत, त्या पत्त्यावर संबंधित नावाची कोणतीही व्यक्ती राहत नाही. तसे सर्व पुरावे सादर केल्यानंतरही आयुक्तांकडून वारंवार माझी चौकशी लावली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी मी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगानेही या प्रकरणी १५ दिवसांत अहवाल मागितला. मात्र त्यातही आयुक्तांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप विग यांनी केला आहे.संबंधित प्रकरणाची माहिती विग यांनी गृह राज्यमंत्री राम शिंदे यांना दिली असता त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडेही विग यांच्याविरोधात ज्या व्यक्तीने तक्रार केली होती, ती व्यक्तीही अस्तित्वात नसल्याचे विग यांनी सांगितले. मात्र संबंधित तक्रारीची दखल घेत मुंडे यांनीही चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे केवळ मानसिक त्रास देण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करून चौकशी केली जात असल्याचा दावा विग यांनी केला आहे. (प्रतिनिधी)