बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन

By admin | Published: August 24, 2015 02:05 AM2015-08-24T02:05:26+5:302015-08-24T02:05:26+5:30

सात वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या युवतीने केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून अटक झालेल्या मुबीन सौदागर या मालिकांमध्ये विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकाराची सत्र

Accused of rape | बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन

बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन

Next

मुंबई : सात वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या युवतीने केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून अटक झालेल्या मुबीन सौदागर या मालिकांमध्ये विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकाराची सत्र न्यायालयाच्या न्या. शनाया पाटील यांनी रोख २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
तक्रारदार युवती ही मुबीन बक्ष सौदागर याच्यासोबत सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. त्याने दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याची माहिती मिळताच तक्रारदार युवतीने ५ आॅगस्टला ओशिवरा पोलीस ठाण्यात सौदागरविरोधात तक्रार दाखल केली होती. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असतानाच्या काळात सौदागर याने अनेकदा बलात्कार केला आणि तीन वेळा आपणास गर्भपात करण्यास भाग पाडले, असे तिने तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल करून सौदागरला अटक केली. त्यावेळी ‘मी पत्नीला तलाक देऊन तुझ्याशी विवाह करेन; मात्र तक्रार मागे घे’, अशी विनवणी सौदागर याने केल्याने तक्रारदार युवतीने महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज करून आपण गैरसमजातून तक्रार दाखल केल्याने आता सौदागर याला सोडण्यात यावे, अशी विनंती केली. मात्र महानगर दंडाधिकाऱ्यांनी असा अर्ज मंजूर करणे आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगत तो फेटाळून लावला.
त्यानंतर आरोपी सौदागर याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्याच्यावतीने अ‍ॅड. महेश वासवानी यांनी युक्तिवाद केला. लिव्ह इन रिलेशनच्या काळातील शरीरसंबंध हा बलात्कार ठरू शकत नाही. तसेच आरोपीची सुटका करण्यास तक्रारदार युवतीचाही आक्षेप नसल्याचे अ‍ॅड. वासवानी यांनी निदर्शनास आणले. त्यावर आरोपी आणि फिर्यादी दोघेही प्रौढ असून सहमतीने त्यांचे संबंध होते. आपल्या दाव्यातील सत्यता दर्शवणारे पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत, असे नमूद करीत न्यायालयाने आरोपीची २५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. धारिणी नागडा आणि अ‍ॅड. सुशील पांडे यांनी, तर तक्रारदार युवतीच्या वतीने अ‍ॅड. अनुश्री कुलकर्णी आणि अ‍ॅड. लता शानभाग यांनी काम पाहिले. अ‍ॅड. अंजली वाघमारे या सरकारी वकील होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Accused of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.