आठ वर्षांनी आरोपीला आजन्म कारावास; तीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 08:22 AM2023-12-30T08:22:42+5:302023-12-30T08:23:23+5:30
दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर हा फैसला सुनावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जवळपास आठ वर्षांपूर्वीच्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या पोक्सोच्या प्रकरणातील आरोपी सूरज ऊर्फ सूर्या महत्तम मंडल (३४) याला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर शुक्रवारी हा फैसला सुनावण्यात आला.
अल्पवयीन मुलगी ही २०१६ मध्ये गोरेगाव पूर्वच्या वडारीपाडा झोपडपट्टी राहायची. त्याच परिसरात राहणाऱ्या मंडलच्या घरात ती अन्य लहान मुलांसोबत खेळायला जायची. याचा फायदा घेत मंडल या मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब त्याच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलीला त्याच अवस्थेत सोडून मंडल तिथून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, दिंडोशी पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना स्थानिकांनी याची माहिती दिली.
दिंडोशी न्यायालय परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त
या घटनेप्रकरणी कसून तपास करत आरोपी विरोधात सर्व सबळ पुरावे गोळा करत वेळेत आरोपपत्रही कोर्टात हजर केले. त्यानुसार याप्रकरणी मंडलला आजन्म सश्रम कारावास, दोन हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात, निरीक्षक धनंजय कावडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मणचेकर, हवालदार तांबे, शिपाई झोडगे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले तसेच समन्स व कार्यालयीन कामकाज हवालदार कर्पे, शिपाई माने, पाटिल, भोसले यांनी पाहिले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिंडोशी पोलिसांनी सत्र न्यायालय परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.