Join us

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपींवर दहशतवादाचे आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 5:39 AM

आरोप निश्चितीवेळी १२ आरोपींपैकी ११ आरोपी उपस्थित होते. मैसूर कारागृहात ठेवण्यात आलेल्या अमोल काळेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले नाही.

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी विशेष न्यायालयाने १२ आरोपींवर दहशतवाद व अन्य आरोपांखाली बुधवारी आरोप निश्चित केले. न्या. डी. ई. कोठालीकर यांनी आरोपींवर बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तसेच स्फोटके कायदा, शस्त्रास्त्र कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा त्याशिवाय गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, पुरावे नष्ट करणे इत्यादीअंतर्गत आरोप निश्चित केले.

आरोप निश्चितीवेळी १२ आरोपींपैकी ११ आरोपी उपस्थित होते. मैसूर कारागृहात ठेवण्यात आलेल्या अमोल काळेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले नाही. परंतु, त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायाधीशांसमोर उपस्थित करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप समजावून सांगितले. सगळ्यांनी आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. आता काही कागदपत्रे आणि सरकारी वकिलांनी साक्षीदारांची यादी सादर केल्यानंतर या खटल्याला सुरुवात होईल. न्यायालयाने पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

यूएपी कायद्यातील कलम १६, १८ (कट रचणे), १८ ए (दहशतवादी कृत्यासाठी कॅम्प आयोजित करणे), १८ बी (दहशतवादी कृत्यासाठी लोकांची भरती करणे), १९, २0 (दहशतवादी गँगचा सदस्य) आणि २३ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ‘या सर्वांविरुद्ध स्फोटके कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्याइतपत सकृतदर्शनी पुरावे आहेत,’ असे न्यायालयाने म्हटले. शरद कळसकर, वैभव राऊत, सुंधवा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, लीलाधर लोढी, वासुदेव सूर्यवंशी, सुजीत रंगास्वामी, भारत कुरणे, अमोल काळे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या १२ आरोपींवर न्यायालयाने आरोप निश्चित केले. राऊत याच्या घरातून बॉम्ब जप्त करण्यात आल्यानंतर तपास यंत्रणेने १२ जणांवर आरोपपत्र दाखल केले.

टॅग्स :मुंबईदहशतवादी