ड्रग्ज तस्करीतील साक्षीदाराला धमकी... कारागृह सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पर्दाफाश करत जप्त केलेल्या १५५ किलो एमडी प्रकरणातील साक्षीदाराला धमकाविल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आर्थर रोड कारागृहात असलेला मुख्य सूत्रधार चिठ्ठीमार्फत याबाबतचे संदेश देत होता. त्यामुळे कारागृह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जून, २०१५ मध्ये एटीएसने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत १५५ किलो एमडी साठा जप्त केला होता. या प्रकरणी मुख्य सूत्रधार साजिद इलेक्ट्रिकवाला याच्यासह सात आरोपींना अटक करण्यात आली. तो आर्थर रोड कारागृहात असून, अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. अशातच या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराला नोव्हेंबरपासून प्रलोभने दाखवून खोटी साक्ष देण्यासाठी धमकाविण्यास सुरुवात झाली.
याबाबत त्याने एटीएसच्या चारकोप पथकाकडे धाव घेतली. त्यानुसार, गुन्हा नोंद करत, आरोपी सुजीत पडवळकर याला अटक केली. पडवळकर याने गँगस्टर हरिष मांडवीकर याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटू याच्या सांगण्यावरून धमकाविल्याची कबुली दिली. त्यानुसार, त्यालाही अटक केली. यात कोळेकरने मांडवीकरच्या सांगण्यानुसार पुढे धमकाविल्याचे सांगितले. मांडवीकर याच्याविरुद्ध दोन हत्येच्या गुन्ह्यासह १३ गुन्हे दाखल आहेत. यात मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा लागलेली आहे. तो सध्या आर्थर रोड कारागृहात कैद असून, कारागृहाच्या आतूनच कोळेकरच्या नावाने हस्तलिखित चिठ्ठी पाठवून याबाबतचे संदेश दिले.
पुढे मांडवीकर आणि इलेक्ट्रिकवाला यांनी कारागृहातच याबाबत कट आखत धमकाविण्यास सांगितले. त्यानुसार, दोघांना ताब्यात घेत, या गुन्ह्यात अटक केली.
...
मार्चपासून सुरू होता चिठ्ठ्यामार्फत संवाद...
मांडवीकर हा मार्च महिन्यात कारागृहात दाखल झाल्यापासून अशा प्रकारच्या चिठ्ठ्या कारागृहाबाहेर पाठवत होता. पत्नी हेमलता मांडवीकरसह त्याच्या गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली परिसरातील हस्तकांसाठी या चिठ्ठ्या पाठविण्यात येत होत्या. या चिठ्ठीमार्फत पत्नी त्यास दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहात पाठवत होती, तर कोळेकर त्याचे अन्य कामे हाताळत होता. या चिठ्ठ्या कारागृहाबाहेर कशा पाठवत होता? याबाबत अधिक तपास सुरू आहे.