Join us

आरोपींची ओळख पटली!

By admin | Published: May 24, 2015 2:00 AM

शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन तरुणांची ओळख पटली आहे.

मुंबई : शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन तरुणांची ओळख पटली आहे. दोघे २५ वर्षांच्या आतील असून बालपणीचे मित्र आहेत. ते आरे कॉलनीतच राहतात. त्यांच्यापैकी एक चित्रनगरीजवळील वडापावच्या गाडीवर काम करतो, ही माहिती तपास अधिकाऱ्यांसमोर आली आहे. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची पथके या तरुणांच्या मागावर आहेत.शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हे हल्लेखोर पल्सर बाईकवरून पसार झाले. मात्र चित्रनगरीच्या प्रवेशद्वारापासून सुमारे २०० मीटर अंतरावर त्यांनी बाईक सोडली आणि पसार झाले. हल्लेखोरांनी मागे सोडलेल्या बाईकमुळेच पोलीस आरोपींची ओळख पटविण्यात यशस्वी झाले. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाईकच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने लगोलग मालकाची माहिती मिळवली. ही बाईक मालाड-मढ परिसरात राहणाऱ्या किरण कोळी नावाच्या तरुणाची आहे, असे समजले. कोळीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पाच-सहा महिन्यांपूर्वी आरे कॉलनीत राहणाऱ्या सुचित तळेकर या तरुणाला ही बाईक विकल्याचे कोळीने सांगितले. या व्यवहारासंबंधी काही कागदपत्रेही कोळीने पोलिसांना दाखवली. त्यानंतर पोलिसांनी सुचितला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुचितने ही बाईक आपलीच असल्याची कबुली दिली. मात्र शिंदेंवरील गोळीबाराच्या घटनेआधी बाईक धाकटा भाऊ अमित घेऊन गेला होता. अमितसोबत त्याचा मित्रही होता, असे सुचितने सांगितले.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अमित व त्याचा मित्र हे दोघेही फरार आहेत. त्यांचे फोनही बंद आहेत. या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या तपासातून या दोघांनीच शिंदेंवर गोळीबार केला असावा, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चित्रनगरीतल्या सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांना मिळाले आहे. त्यात ही घटनाही कैद झाली आहे. हल्लेखोरांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्यांचे चेहरे तेथे उपस्थित असलेल्यांना पाहता आले नाहीत. सीसीटीव्हीच्या चित्रणातील हल्लेखोरांची देहबोली या दोन संशयित तरुणांशी मिळतीजुळती आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गुन्ह्यात दोन हल्लेखोरांव्यतिरिक्त आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, असा संशय गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिंदेंवरील गोळीबाराचा हेतू, गुन्ह्यात सहभागी अन्य आरोपींची ओळख हल्लेखोर अटक झाल्यावर स्पष्ट होईल, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. तूर्तास मुख्य संशयित दोन तरुणांच्या मोबाइल लोकेशनवर पोलीस काम करीत असल्याची माहिती मिळते. दरम्यान, शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे स्वीय साहाय्यक नामदेव यांनी सांगितले. शिंदे यांच्यावर नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटात अडकलेली एक गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर शिंदे शुद्धीवर आले आहेत. मात्र न बोलण्याची ताकीद डॉक्टरांनी दिली आहे, अशी माहिती नामदेव यांनी ‘लोकमत’ला दिली. च्गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नाहीत. तसेच घटनेवेळी ते घटनास्थळाच्या दोनशे मीटर परिघात नव्हते. काल घटनेनंतर बच्चन यांनी माझ्यापासून २० फुटांवर गोळीबार झाला, असे टिष्ट्वट केले होते. च्शिंदेंची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचाही जबाब पोलीस नोंदवतील. घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे व्यावसायिक भागीदार संदीप भोसले व त्यांचा सहकारी राजू हे दोघे होते. या दोघांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मात्र त्यांचे फोन तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.